काही दिवसांपूर्वी आपल्या आस्था प्रकल्पात प्राजक्ता नावाची 23 वर्षांची एक मुलगी, तिच्या 18 महिन्यांच्या बाळाला सोबत घेउन, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, रहायला आली होती. हे तसे नवीन नाही. याआधिही अशा मुली / महीला आपल्याकडे आल्या होत्याच. पण प्राजक्ताच्या सासरची परिस्थिती थोडी वेगळी होती कारण प्राजक्ता आपल्याकडे आल्यानंतर लगेचच, अगदी 1-2 तासातच ती मंडळी, तिच्या माहेरच्या 2 जणांना सोबत घेउन, तिला व तिच्या बाळाला परत न्यायला आपल्या प्रकल्पात पोहचली पण होती. प्राजक्ता याआधिही अश्या प्रकारे माहेरी गेली होती पण नाईलाजाने परत सासरीही गेली होती. आणि यावेळेसही त्यांचा तसाच प्रयत्न दिसत होता. त्यांनी आम्हालाही सांगायचा प्रयत्न केला की हिचे मानसिक संतुलन ठीक नाही, ती तिच्या मुलाला सांभाळू शकत नाही, इ. आणि नंतर मग म्हणायला लागले की तीला रहायचे आहे तर राहू द्या पण बाळाला मात्र आम्ही घेउन जातो. आणि हे सर्व बोलणे सुरू असतांना प्राजक्ता काहीच बोलत नव्हती, ती फक्त रडत होती. पण ते बाळाला घेउन जातो असे म्हणायला व तसे ते प्रत्यक्ष करतील असे वाटल्यानंतर मात्र आम्ही त्यांना सांगीतले की थांबा, तिचे काय म्हणणे आहे ते ही एकून घ्या. आणि मग थोड्या वेळाने प्राजक्ता अगदी हळू आवाजात नाही म्हणाली. तीने त्यांच्या सोबत जायला नकार दिला आणि बाळालाही त्यांच्या सोबत नेउ देण्यास नकार दिला. तिने हळू आवाजात, रडत रडत, पण स्पष्टपणे नकार दिला. आणि मग मात्र त्यांचा सुर बदलला व ते आम्ही बाळाला कायदेशीर रित्या घेउन जाउ, इ. म्हणायला लागले. पण मग नंतर थोड्या वेळाने ते सर्व परतही गेले. आणि प्राजक्ता आपल्या इथे तिच्या बाळासोबत रहायला लागली. नंतर काही वेळाने तिच्या माहेरची जी मंडळी सोबत आली होती त्यांचा मला phone आला व त्यांनी सांगीतले की प्राजक्ता चांगली मुलगी आहे तिने खुप त्रास सहन केला आहे पण आम्हाला त्यांच्यासमोर तसे बोलता येत नव्हते, इ. आणि तुम्ही जे केले ते खुप चांगले केले. नंतर प्राजक्ता 4-5 दिवस आपल्याकडे राहीली, या दरम्यान ती तिच्या आई वडीलांशीही बोलली, त्यांनीही तिचे म्हणणे एकून घेतले आता परत सासरी जाउ नको, आमच्याकडे ये, आम्ही तुझ्या सोबत आहोत असे सांगीतले व आपण पुढील आवश्यक ती प्रक्रीयाही करू असेही सांगीतले व त्यानुसार प्राजक्ता तिच्या माहेरी परत गेली. सध्या ती त्यांच्यासोबत आहे. आनंदात आहे. पुढे काय करायचे याचा विचार व त्याची तयारी करत आहे.
पण मी मघाशी म्हणाली त्याप्रमाणे यात नवीन अस काही नाही. हे बहुतेक तरी खुप मुलींच्या बाबतीत घडत. काही त्रास सहन करतात, करत राहतात तर काही जणी हिंमत करून या त्रासातून मुक्त होतात. पण तरीही प्रश्न राहतोच की जे झाले ते चांगले झाले का, ते व्हायलाच पाहीजे होते का. माहीत नाही. याच सगळ्यांना लागू पडेल, सगळ्यांसाठी आणि सगळ्या परिस्थितीत बरोबर असेल अस काही उत्तर नाही आहे बहुतेक. कारण प्रत्येक छोट्या मोठ्या मतभेदासाठी एकदम टोकाची भुमीका घेण जस चुकीच आहे तसच हे तर सगळ्यांच्याच बाबतीत होत त्यात नवीन काय आहे अस म्हणून होत असलेल्या प्रत्येक अन्यायाकडे / त्रासाकडे दुर्लक्ष करण, तो सहन करण, तो सहन करायला लावण हे ही सगळ चुकीचच आहे अस मला / आम्हाला वाटत. पण याबाबतीत ज्याचा त्याच्या निर्णय त्या त्या व्यक्तीने स्वतःच घ्यायचा असतो, योग्य काय अयोग्य काय हे ही त्या व्यक्तीने स्वतःच ठरवायच असत असही मला / आम्हाला वाटत. आणि अशी वेळ कोणावरही येउ नये असही मला / आम्हाला वाटत..
पण असो. बाकी सगळे छान. गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा.