काल जागतिक महिला दिना निमीत्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आयोजीत केलेल्या “सन्मान ती चा” या कार्यक्रमात मी करत असलेल्या कामाचा / माझा सन्मान करण्यात आला. खुप आनंद झाला.
कार्यक्रमात क्षीप्रा मानकर ताई, प्रियदर्शिनी हिंगे ताई, रविंद्र आंबेकर दादा (Ravindra Ambekar), डॉ. रागिणी पारेख ताई, रूपाली चाकणकर ताई, आणि इतर सन्मारार्थी या सगळ्या मान्यवरांना भेटून छान वाटल. मजा आली.
आणि नेहमीसारखच सारिका (Sarika Gaikwad) आणि मिलींद सरनोबत काका सोबत असल्यामुळे मुंबईतील प्रवास अगदीच छान झाला. Thank you.
सध्या आपल्या आस्था प्रकल्पामध्ये राहत असलेल्या दोघींपैकी एक म्हणजे शीलाबाई. दोघी म्हाताऱ्या आहेत, थकलेल्या आहेत पण शिलाबाई थोड्या जास्तच. त्या त्यांच्या गावाला एकट्या रहात होत्या. मुल, मुली आहेत. पण तरीही एकट्याच रहात होत्या. या पावसाळ्यात त्यांची झोपडी पडली, सामानही खराब झाल, हरवल. आणि म्हणून मग उघड्यावर. त्यांच्या गावातल्या, ओळखीच्या कमलाबाई आपल्या आश्रमात रहात होत्या म्हणून मग या ही इथे रहायला आल्या. सुरवातीला आणि कधी कधी अजूनही त्या नातेवाईकांना भेटायला जातात पण मग परतही येतात. पण आता इथे रूळल्या आहेत, जमेल ते काम करत आहेत, आणि इथे आनंदाने रहात आहेत.
काही दिवसांपूर्वी मी त्यांना एक नवीन लुगड दिल, त्यांना खुप आवडल, त्यांनी ते घातल, सगळ्यांना दाखवल आणि अगदी विचारलही की कशी दिसते आहे. त्या दिवशी त्या जाम खुश होत्या. आनंद अगदी चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. आणि त्यांना अस आनंदात पाहून मलाही आनंद होत होता, होत आहे आणि समाधानही.
काही दिवसांपूर्वी आपल्या आस्था प्रकल्पात प्राजक्ता नावाची 23 वर्षांची एक मुलगी, तिच्या 18 महिन्यांच्या बाळाला सोबत घेउन, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, रहायला आली होती. हे तसे नवीन नाही. याआधिही अशा मुली / महीला आपल्याकडे आल्या होत्याच. पण प्राजक्ताच्या सासरची परिस्थिती थोडी वेगळी होती कारण प्राजक्ता आपल्याकडे आल्यानंतर लगेचच, अगदी 1-2 तासातच ती मंडळी, तिच्या माहेरच्या 2 जणांना सोबत घेउन, तिला व तिच्या बाळाला परत न्यायला आपल्या प्रकल्पात पोहचली पण होती. प्राजक्ता याआधिही अश्या प्रकारे माहेरी गेली होती पण नाईलाजाने परत सासरीही गेली होती. आणि यावेळेसही त्यांचा तसाच प्रयत्न दिसत होता. त्यांनी आम्हालाही सांगायचा प्रयत्न केला की हिचे मानसिक संतुलन ठीक नाही, ती तिच्या मुलाला सांभाळू शकत नाही, इ. आणि नंतर मग म्हणायला लागले की तीला रहायचे आहे तर राहू द्या पण बाळाला मात्र आम्ही घेउन जातो. आणि हे सर्व बोलणे सुरू असतांना प्राजक्ता काहीच बोलत नव्हती, ती फक्त रडत होती. पण ते बाळाला घेउन जातो असे म्हणायला व तसे ते प्रत्यक्ष करतील असे वाटल्यानंतर मात्र आम्ही त्यांना सांगीतले की थांबा, तिचे काय म्हणणे आहे ते ही एकून घ्या. आणि मग थोड्या वेळाने प्राजक्ता अगदी हळू आवाजात नाही म्हणाली. तीने त्यांच्या सोबत जायला नकार दिला आणि बाळालाही त्यांच्या सोबत नेउ देण्यास नकार दिला. तिने हळू आवाजात, रडत रडत, पण स्पष्टपणे नकार दिला. आणि मग मात्र त्यांचा सुर बदलला व ते आम्ही बाळाला कायदेशीर रित्या घेउन जाउ, इ. म्हणायला लागले. पण मग नंतर थोड्या वेळाने ते सर्व परतही गेले. आणि प्राजक्ता आपल्या इथे तिच्या बाळासोबत रहायला लागली. नंतर काही वेळाने तिच्या माहेरची जी मंडळी सोबत आली होती त्यांचा मला phone आला व त्यांनी सांगीतले की प्राजक्ता चांगली मुलगी आहे तिने खुप त्रास सहन केला आहे पण आम्हाला त्यांच्यासमोर तसे बोलता येत नव्हते, इ. आणि तुम्ही जे केले ते खुप चांगले केले. नंतर प्राजक्ता 4-5 दिवस आपल्याकडे राहीली, या दरम्यान ती तिच्या आई वडीलांशीही बोलली, त्यांनीही तिचे म्हणणे एकून घेतले आता परत सासरी जाउ नको, आमच्याकडे ये, आम्ही तुझ्या सोबत आहोत असे सांगीतले व आपण पुढील आवश्यक ती प्रक्रीयाही करू असेही सांगीतले व त्यानुसार प्राजक्ता तिच्या माहेरी परत गेली. सध्या ती त्यांच्यासोबत आहे. आनंदात आहे. पुढे काय करायचे याचा विचार व त्याची तयारी करत आहे.
पण मी मघाशी म्हणाली त्याप्रमाणे यात नवीन अस काही नाही. हे बहुतेक तरी खुप मुलींच्या बाबतीत घडत. काही त्रास सहन करतात, करत राहतात तर काही जणी हिंमत करून या त्रासातून मुक्त होतात. पण तरीही प्रश्न राहतोच की जे झाले ते चांगले झाले का, ते व्हायलाच पाहीजे होते का. माहीत नाही. याच सगळ्यांना लागू पडेल, सगळ्यांसाठी आणि सगळ्या परिस्थितीत बरोबर असेल अस काही उत्तर नाही आहे बहुतेक. कारण प्रत्येक छोट्या मोठ्या मतभेदासाठी एकदम टोकाची भुमीका घेण जस चुकीच आहे तसच हे तर सगळ्यांच्याच बाबतीत होत त्यात नवीन काय आहे अस म्हणून होत असलेल्या प्रत्येक अन्यायाकडे / त्रासाकडे दुर्लक्ष करण, तो सहन करण, तो सहन करायला लावण हे ही सगळ चुकीचच आहे अस मला / आम्हाला वाटत. पण याबाबतीत ज्याचा त्याच्या निर्णय त्या त्या व्यक्तीने स्वतःच घ्यायचा असतो, योग्य काय अयोग्य काय हे ही त्या व्यक्तीने स्वतःच ठरवायच असत असही मला / आम्हाला वाटत. आणि अशी वेळ कोणावरही येउ नये असही मला / आम्हाला वाटत..
पण असो. बाकी सगळे छान. गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा.
आपला जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती (Irwin Hospital, Amravati) येथील अन्नदानाचा उपक्रम आज 10000 मोफत जेवण वाटपाचा टप्पा गाठत आहे. उपक्रमात सहभागी असलेल्या सगळ्यांचे आभारी आहोत.
Arti Amte – Nankar, Shital Bhatkar, With Arya Foundation.
आम्ही आस्था प्रकल्प सुरू केला तेव्हा त्यात काय काय अडचणी येतील याबद्दल बराच विचार केला होता आणि त्या वेळेस वाटत होत्या त्या जवळपास सगळ्याच अडचणी आल्याही. पण त्या अपेक्षित होत्या, त्यामुळे त्यांच्या बद्दल काही ना काही उपाय योजना देखील मनात होती आणि जरी मनात होत तस सगळं झाल नाही तरी त्याचा फार काही त्रास झाला नाही. पण त्या वेळेस एक गोष्ट मात्र लक्षात आली नव्हती किंवा त्याचा किती त्रास होऊ शकतो याचा विचार आम्ही केला नव्हता आणि ती गोष्ट म्हणजे – आपल्याकडे कायम नवीन नवीन माणसं येत राहतील आणि अर्थातच ते कधी तरी परत / आपल्या पासून दूर ही जातील आणि या सगळ्यामुळेही आपल्याला वाईट वाटेल, त्रास होईल…
आम्हाला हे आता प्रकर्षाने जाणवत आहे कारण मागील काही महिन्यात आमच्या प्रकल्पात राहणारी, भोजनालयात काम करणारी बरीच माणसं बदलली. अगदी आपल्याकडे माणसं फार दिवस टिकत नाहीत असा विचार मनात यावा एवढी. त्यामुळे आपण काही चुकीच तर करत नाही आहोत ना, चुकीच वागत तर नाही आहोत ना, असे अनेक प्रश्न मनात येत होते. त्याबद्दल आमचे बोलणेही होत होते, विचार सुरू होता पण नक्की कारण समजत नव्हते आणि मग अचानक लक्षात आले की हे तर होणारच आहे. कारण एखाद्या घरात जेव्हा नवीन व्यक्ती येते किंवा जाते त्या प्रत्येक वेळेस त्या घरातील इतर व्यक्तींच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होतच असतो आणि बऱ्याचदा तो बदल / तो परिणाम त्यांना आवडत नसतो. म्हणजे एखाद्या घरात नवीन मुल जन्माला आल्यानंतर त्या मुलाच्या मोठ्या भावंडांना आता आपले आई वडील आपल्याकडे कमी लक्ष देतात असे वाटायला लागते, त्यांना आपली खेळणी व आपले सामान त्या नवीन बाळा सोबत वाटावे लागते, त्याला आपल्या खेळात सामावुन घ्यावे लागते, सांभाळून घ्यावे लागते आणि हे सगळं त्या मोठ्या भावंडांना शक्यतो आवडत नाही हे त्याप्रमाणे आहे बहुतेक. किंवा मग लग्न झाल्यानंतर मुलगा आपल्याकडे कमी लक्ष देतो असे जवळपास प्रत्येक आईला वाटायला लागते हे त्याप्रमाणे आहे बहुतेक. म्हणजे आमच्या प्रकल्पात जेव्हा जेव्हा नवीन व्यक्ती रहायला आली किंवा प्रकल्प सोडून गेली तेव्हा तेव्हा प्रकल्पात राहत असलेल्या इतरांवर, भोजनालयात काम करत असलेल्या इतरांवरही, त्याचा परिणाम झालाच – कधी त्यांना त्यांची खोली share करावी लागली, कधी कधी बदलावीही लागली, त्यांना त्यांच्या सवयींमध्ये बदल करावे लागले, त्यांच्या कामामध्ये व कामाच्या वेळांमध्ये बदल करावे लागले आणि हे बदल बहुतेक तरी त्यांना आवडले नाहीत, मानवले नाहीत. पण ही झाली एक बाजू.
आणि दुसरी बाजू म्हणजे हे सर्व बदल आणि त्याचा परिणाम आमच्याही आयुष्यावर होत होताच. आणि खरतर इतरांपेक्षा जरा जास्तीच. कदाचित आमचा प्रकल्प छोटा असल्यामुळे असेल हे असे, किंवा स्वभावामुळे असेल हे असे, पण आमच्या प्रकल्पातील प्रत्येक व्यक्ती सोबत आमची / माझी खुप attachment होती / आहे. ते देखील आमच्या कुटुंबाचाच भाग होते / आहेत. आणि जसे आपल्याला आपल्या घरातील मुलांना / इतरांना कधी कधी ओरडावे लागते, कधी समजवावे लागते, कधी शिक्षा करावी लागते, कधी सांभाळून घ्यावे लागते, कधी कधी दुर्लक्ष करावे लागते अगदी तसेच आम्हाला या सर्वांच्या बाबतीत करावे लागते. पण थोड्या जास्ती वेळेस. आणि या सोबतच, आणि त्यामुळेच, जेव्हा जेव्हा कोणी कुठल्याही कारणामुळे प्रकल्प, किंवा आमचे भोजनालय, सोडून जातो त्या जवळपास प्रत्येक वेळेस मला / आम्हाला खुप प्रश्न पडतात, खुप त्रास होतो, खुप वाईट वाटत. आणि हे वारंवार झाल आहे. होत आहे. होणार आहे.
आणि या गोष्टीचा विचार आम्ही आधी केला नव्हता. आणि आता तो केला तरीही त्यावर काही उपाय योजना सुचेल असे आता वाटत नाही. पण तरीही माझी / आमची हौस अजून फिटलेली नाही आणि त्यामुळे परत एकदा या सगळ्याला सामोरे जायला मी / आम्ही तयार आहोत. बघूया पुढे काय होते ते.
प्रकल्पाचे व भोजनालयाचे काम व्यवस्थित व नियमीतपणे सुरू आहे. सध्या प्रकल्पात 1 वृध्द गृहस्थ राहत आहेत. इतरही काही जण प्रकल्पात रहायला येतो असे म्हणत आहेत पण वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या तरी प्रकल्पात हे काका एकटेच आहेत. व मागच्या महिन्यात आपण अमरावतीमधील जिल्हा सामान्य रूग्णालयातील (Irwin Hospital मधील) canteen ही चालवायला घेतले आहे, व आस्था भोजनालय तेथे shift केले आहे. आणि आमच्यासाठी ही जागा नवीन असल्यामुळे, घरापासून थोडी लांब आणि जास्त वर्दळीची असल्यामुळे, आणि खर्चही वाढल्यामुळे आम्हाला हे सर्व manage करायला थोडं अवघड होत आहे, पण तरीही काम व्यवस्थित व नियमीतपणे सुरू आहे.
मी हे परत व मुद्दाम हून सांगीतले कारण मागच्या 1-2 महिन्यात आम्हाला हे जाणवले, विशेष करून जाणवले, की काही जणांना (बहुतेक बऱ्याच जणांना) आम्ही हे भोजनालय का सुरू केले आहे, व आमची इतर कामे सोडून आम्ही ते का चालवत आहोत हे नीट लक्षात येत नाही. आणि काही जणांना (बहुतेक बऱ्याच जणांना) असेही वाटते की आम्ही फक्त हे भोजनालयच चालवतो. आमच्यावर प्रेम करणाऱ्या काही जणांनी आम्हाला तस स्पष्टपणे विचारलेही आहे की आम्ही हे भोजनालय का चालवतो? आता इतरांना काय वाटते याने आम्हाला फारसा फरक पडत नाही, पण कोणी स्पष्ट विचारले तर आम्ही उत्तर जरूर देतो. आणि असाच प्रश्न काही दिवसांपूर्वी आमच्या एका स्नेहींनी विचारल्यावर उदयने त्यांना जे उत्तर दिले ते त्यांनाही तर्कसंगत वाटले, पटले व ते थोडक्यात असे होते – हा काही आमचा व्यवसाय नाही. पण हे भोजनालय या प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे व हा प्रकल्प त्याशिवाय चांगल्या रीतीने सुरू राहू शकत नाही. आणि हा प्रकल्प सुरू रहावा, चांगल्या रीतीने सुरू रहावा असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही हे भोजनालय चालवतो.
आमचा प्लॉट, त्यावरील घर व त्यातील प्रकल्पाची जागा –
कर्ज अजून मंजूर झालेले नाही आणि त्यामुळे बांधकामही अजून सुरू झाले नाही. सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव व इतर प्रयत्न सुरू आहेत. व बांधकामही लवकरच सुरू होईल अशी आशा आहे.
इतर –
मागच्या 1-2 महिन्यात काही कौटुंबिक कार्यक्रमांमुळे जवळपास सगळ्याच मित्र मंडळी, नातेवाईक यांच्या बऱ्याच दिवसांनंतर भेटी झाल्या. छान वाटले. मला काही कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची, बोलण्याची, प्रकल्पाबद्दल सांगण्याची संधीही मिळाली. त्यामुळेही छान वाटले पण मी अधिक चांगल्या रीतीने बोलायला, मनातले विचार स्पष्टपणे मांडायला शिकले पाहिजे हेही जाणवले. त्यासाठी आता प्रयत्न करेल.
आणि सध्या इतर काही करायला फारसा वेळच मिळत नाही आहे. पण तरीही जमेल ते, व आवश्यक ते सुरूच आहे.
बाकी सगळे छान. नवीन वर्षासाठी परत एकदा शुभेच्छा.
आस्था भोजनालय आता Irwin Hospital च्या (अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या) Canteen येथे shift झाले आहे.आस्था प्रकल्पातील दत्तात्रय नांदूरकर काका. त्यांना व्यवस्थित दिसत नाही तरी शक्य त्या कामात मदत करण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात.हेमलकसा येथील 5 km ची लोक बिरादरी Hemalkasa Marathon Race मध्ये मी आणी श्री ने ही भाग घेतला, पुर्णही केली.Max Woman, Max Maharashtra तर्फे आयोजीत शिक्षणाचा रस्ता कुठपर्यंत पोहचला या चर्चासत्रात मी भाग घेतला. बहुतेक पहिल्यांदाच.
https://www.youtube.com/watch?v=GvU73EnAnLoबडनेरा येथील एका महिला समुपदेशन केंद्राच्या उद्याटनाच्या कार्यक्रमाही सहभागी झाली होती.काही दिवसांपुर्वीच्या एका कार्यक्रमासाठी आस्था भोजनालयाने पुरवलेले 50 लोकांचे जेवण.आस्था प्रकल्पातील बगीचा, फुले.काही updates
27 व 28 तारखेला (27 – 28 November 2022) USHA, AFARM व आपल्या संस्थेने आयोजीत केलेला 2 दिवसांचा शिलाई प्रशिक्षणाचा कार्यक्रम आस्था भोजनालय, यशोदा नगर, अमरावती येथे पुर्ण झाला.
कार्यक्रमात 20 महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. USHA तर्फे आलेल्या भंडारा येथील master trainer वर्षा मते यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्षात उपयोगात येईल अशा पध्दतीने शिकवले. ते सगळ्यांना आवडले.
आणि समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून माझ्या जिवलग मैत्रिणी डॉ. मिनाक्षी व्यवहारे (Minakshi Mendhe Vyawahare) व सौ. आरती देशमुख (Aarti Deshmukh) या उपस्थित राहील्या, त्यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. व एकंदरीत हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम छान पार पडला.
डॉ. मिनाक्षी व्यवहारे व सौ. आरती देशमुख यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.
जवळपास 1 वर्षापुर्वी आपल्या प्रकल्पात लहान मुलांची सोय होत नाही म्हणून सुनीता (आपल्या प्रकल्पातील एक निवासी) तिच्या गावी परत गेली होती. त्याचे आम्हाला त्यावेळेस खुप वाइट वाटले होते, अजूनही वाटते. आणि या वर्षभरात बाकीही बरेच अनुभव आले, हे काम करता करता आम्ही खुप काही शिकलोही. आणि या अनुभवातून अजूनही शिकतच आहोत.
पण आपल्या या प्रकल्पाचा, या कामाचा, अर्चना व तिच्या मुलीसारख्या काही जणांना फायदा झाला, होत आहे याचा आम्हाला खुप आनंद आहे.
आणि खुप जास्ती जरी नाही तरी आणखीन काही गरजू महीलांना, मुलींना, मुलांना, वृध्दांना त्यांना आवश्यकता आहे त्यावेळेस आम्ही मदत करू शकू असा आम्हाला, व आपल्या प्रकल्पातील सगळ्यांना, विश्वास आहे. आणि म्हणूनच अर्चना आपल्या प्रकल्पाबद्दल तिच्यासारख्या इतर महीलांना काही सांगू असे म्हणत आहे. जमल्यास एकाल. गरजू महीलांपर्यंत ही माहिती पोहचवाल.
आम्ही आपल्या आस्था निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे सगळे काम व्यवस्थित होत नाही तो पर्यंत इतर कुठला नवीन कार्यक्रम सुरू करायचा नाही असे ठरवले होते / आहे. पण यादरम्यान काही संधी उपलब्ध झाल्यास त्याबद्दल विचार करून ठरवूया असेही ठरवले होते / आहे. आणि काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील एका दुसर्या संस्थेमार्फत आम्हाला काही गरजू विद्यार्थ्यांना व इतर काही जणांना नियमीतपणे जेवण पुरवण्या संदर्भात मिळून काही कार्यक्रम करता येईल का अशी विचारणा झाली होती. त्यानुसार आम्ही काय करता येईल, लाभार्थ्यांची निवड कशी करता येईल, त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील, अंदाजे किती खर्च होईल, इ. गोष्टींवर विचार करून एक रूपरेषा त्यांच्यासमोर मांडली. चर्चा छान झाली. पण कदाचित आम्ही काढलेला खर्च त्यांना जास्त वाटला असेल किंवा इतर काही कारण असेल पण पुढे मात्र काही ठरले झाले नाही व त्यांच्यासोबतचा हा कार्यक्रम सुरू झाला नाही.
आणि खर्चाची व्यवस्था करणे अवघड असल्यामुळे आम्हीही त्यावर पुढे फारसा विचार केला नाही. पण मनातून तो विचार गेलाही नाही. व आपल्या भोजनालयात अधूनमधून विद्यार्थी half tiffin (कमी पैशात mess) बद्दल चौकशी करत होतेच.
आणि योगायोगाने काल सकाळी उदयने आपण स्वत:च हा कार्यक्रम सुरू करूया, पण छोट्या प्रमाणात, असे सुचवले. आम्ही परत सगळा विचार केला. इतर सर्व ठीक आहे पण खर्चाची व्यवस्था करणे अजूनही अवघडच वाटत आहे. पण तरीही आम्ही 1 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू करत आहोत व किमान 1 वर्ष तरी हा कार्यक्रम सुरू ठेवूया असे सध्या ठरवले आहे. व या कार्यक्रमाचा या 10 विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व indirectly काही प्रमाणात तरी आपल्या आस्था प्रकल्पालाही फायदा होईल असे वाटत आहे. काय होते ते लवकर समजेलच.
तुम्हाला कोणाला या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, या कार्यक्रमासाठी काही मदत करायची असल्यास, आमच्याशी नक्कीच संपर्क साधाल.
काल JCI अमरावतीच्या एका कार्यक्रमात काही महीलांचा, त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यात आला. यात आपल्या आस्था निराधार व गरजू लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाचे व आस्था भोजनालयाचे कामामुळे माझाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम छान झाला. JCI च्या members ला, मैत्रिणींना भेटून, त्यांच्याशी बोलून छान वाटले.