आस्था प्रकल्पातील रहिवासी आणि आम्ही.

आम्ही आस्था प्रकल्प सुरू केला तेव्हा त्यात काय काय अडचणी येतील याबद्दल बराच विचार केला होता आणि त्या वेळेस वाटत होत्या त्या जवळपास सगळ्याच अडचणी आल्याही. पण त्या अपेक्षित होत्या, त्यामुळे त्यांच्या बद्दल काही ना काही उपाय योजना देखील मनात होती आणि जरी मनात होत तस सगळं झाल नाही तरी त्याचा फार काही त्रास झाला नाही. पण त्या वेळेस एक गोष्ट मात्र लक्षात आली नव्हती किंवा त्याचा किती त्रास होऊ शकतो याचा विचार आम्ही केला नव्हता आणि ती गोष्ट म्हणजे – आपल्याकडे कायम नवीन नवीन माणसं येत राहतील आणि अर्थातच ते कधी तरी परत / आपल्या पासून दूर ही जातील आणि या सगळ्यामुळेही आपल्याला वाईट वाटेल, त्रास होईल…

आम्हाला हे आता प्रकर्षाने जाणवत आहे कारण मागील काही महिन्यात आमच्या प्रकल्पात राहणारी, भोजनालयात काम करणारी बरीच माणसं बदलली. अगदी आपल्याकडे माणसं फार दिवस टिकत नाहीत असा विचार मनात यावा एवढी. त्यामुळे आपण काही चुकीच तर करत नाही आहोत ना, चुकीच वागत तर नाही आहोत ना, असे अनेक प्रश्न मनात येत होते. त्याबद्दल आमचे बोलणेही होत होते, विचार सुरू होता पण नक्की कारण समजत नव्हते आणि मग अचानक लक्षात आले की हे तर होणारच आहे. कारण एखाद्या घरात जेव्हा नवीन व्यक्ती येते किंवा जाते त्या प्रत्येक वेळेस त्या घरातील इतर व्यक्तींच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होतच असतो आणि बऱ्याचदा तो बदल / तो परिणाम त्यांना आवडत नसतो. म्हणजे एखाद्या घरात नवीन मुल जन्माला आल्यानंतर त्या मुलाच्या मोठ्या भावंडांना आता आपले आई वडील आपल्याकडे कमी लक्ष देतात असे वाटायला लागते, त्यांना आपली खेळणी व आपले सामान त्या नवीन बाळा सोबत वाटावे लागते, त्याला आपल्या खेळात सामावुन घ्यावे लागते, सांभाळून घ्यावे लागते आणि हे सगळं त्या मोठ्या भावंडांना शक्यतो आवडत नाही हे त्याप्रमाणे आहे बहुतेक. किंवा मग लग्न झाल्यानंतर मुलगा आपल्याकडे कमी लक्ष देतो असे जवळपास प्रत्येक आईला वाटायला लागते हे त्याप्रमाणे आहे बहुतेक. म्हणजे आमच्या प्रकल्पात जेव्हा जेव्हा नवीन व्यक्ती रहायला आली किंवा प्रकल्प सोडून गेली तेव्हा तेव्हा प्रकल्पात राहत असलेल्या इतरांवर, भोजनालयात काम करत असलेल्या इतरांवरही, त्याचा परिणाम झालाच – कधी त्यांना त्यांची खोली share करावी लागली, कधी कधी बदलावीही लागली, त्यांना त्यांच्या सवयींमध्ये बदल करावे लागले, त्यांच्या कामामध्ये व कामाच्या वेळांमध्ये बदल करावे लागले आणि हे बदल बहुतेक तरी त्यांना आवडले नाहीत, मानवले नाहीत. पण ही झाली एक बाजू.

आणि दुसरी बाजू म्हणजे हे सर्व बदल आणि त्याचा परिणाम आमच्याही आयुष्यावर होत होताच. आणि खरतर इतरांपेक्षा जरा जास्तीच. कदाचित आमचा प्रकल्प छोटा असल्यामुळे असेल हे असे, किंवा स्वभावामुळे असेल हे असे, पण आमच्या प्रकल्पातील प्रत्येक व्यक्ती सोबत आमची / माझी खुप attachment होती / आहे. ते देखील आमच्या कुटुंबाचाच भाग होते / आहेत. आणि जसे आपल्याला आपल्या घरातील मुलांना / इतरांना कधी कधी ओरडावे लागते, कधी समजवावे लागते, कधी शिक्षा करावी लागते, कधी सांभाळून घ्यावे लागते, कधी कधी दुर्लक्ष करावे लागते अगदी तसेच आम्हाला या सर्वांच्या बाबतीत करावे लागते. पण थोड्या जास्ती वेळेस. आणि या सोबतच, आणि त्यामुळेच, जेव्हा जेव्हा कोणी कुठल्याही कारणामुळे प्रकल्प, किंवा आमचे भोजनालय, सोडून जातो त्या जवळपास प्रत्येक वेळेस मला / आम्हाला खुप प्रश्न पडतात, खुप त्रास होतो, खुप वाईट वाटत. आणि हे वारंवार झाल आहे. होत आहे. होणार आहे.

आणि या गोष्टीचा विचार आम्ही आधी केला नव्हता. आणि आता तो केला तरीही त्यावर काही उपाय योजना सुचेल असे आता वाटत नाही. पण तरीही माझी / आमची हौस अजून फिटलेली नाही आणि त्यामुळे परत एकदा या सगळ्याला सामोरे जायला मी / आम्ही तयार आहोत. बघूया पुढे काय होते ते.

अर्चनाची मुलगी अदिती आणि मी (आरती आमटे – नानकर)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *