आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प व आस्था भोजनालय, अमरावती

मी आत्ता हे लिहण्यापूर्वी आपल्या निराधार लोकांसाठीच्या निवासी प्रकल्पाबद्दल याआधी केव्हा व काय लिहिले होत ते पहात होते तेव्हा मला लक्षात आल की या प्रकल्पाबद्दल मी जवळपास 5 महिन्यांच्या नंतर काहीतरी लिहित आहे. खुप आश्चर्य वाटलं, आणि थोडं वाईटही. आश्चर्य यासाठी वाटलं की जरी इतक्या दिवसात या प्रकल्पाबद्दल मी काही लिहल नाही तरी, मधल्या काही दिवसांचा अपवाद सोडल्यास, जवळपास रोजच माझे कोणा ना कोणाशी या प्रकल्पाबद्दल काही ना काही बोलणं होतच आहे. आणि वाईट यासाठी वाटलं की आपलं हे काम देखील फारच हळू हळू सुरू आहे हे आज परत एकदा प्रकर्षाने जाणवलं, आणि ठरवून देखील प्रकल्पाबद्दलचे नियमित updates देऊ शकलो नाहीत म्हणूनही.

पण तरीही आनंद याचा आहेच की काम, हळू हळू का असेना पण, सुरू आहे.

तर प्रकल्पाबद्दलचे काही updates –

  • आम्ही प्रकल्पाचे नाव ठेवले. नावाबद्दल बरीच चर्चा झाली, बरीच नाव सुचवली गेली, सगळीच छान होती पण त्यापैकी हे नाव ठेवले (आणि हे नाव अनु दादाने सुचवलेले आहे). प्रकल्पाचे नाव: आस्था – निराधार लोकांसाठीचा निवासी प्रकल्प.
  • प्रकल्पासाठी भाड्याने घेतलेल्या नवीन जागेत आम्ही रहायला आलो. तेथे काही अत्यावश्यक सोयी – सुविधा केल्या, पण अजून बऱ्याच शिल्लक आहेतच.
  • सध्या प्रकल्पात 3 व्यक्ती आहेत (व त्यांची थोडक्यात माहिती https://www.swachha.net/aastha-home-for-destitute येथे पाहता येईल).
  • प्रकल्पाचा भाग म्हणून सुरू करायची होती ती खानावळ देखील सुरू झाली (28 जानेवारी 2021 ला, पण उद्घाटनाचा कार्यक्रम मात्र अजून बाकी आहे). खानावळीचे नाव: आस्था भोजनालय (भोजनालयाचा पत्ता आणि इतर माहिती https://maps.app.goo.gl/vffrGLvN6rgc6XuJ9 येथे व Aastha Bhojanalaya येथे पाहता येईल, आणि ही खानावळ असली तरीही इथले जेवण मात्र छान आहे, त्यामुळे जेवणासाठी नक्की याल, order कराल).
  • प्रकल्पासाठी मदत निधी म्हणून आम्ही जमा करण्याचा प्रयत्न करत होतो तेवढी रक्कम जमा झाली नाही (पण हळू हळू होईलही). त्यामुळे थोड्या अडचणी येत आहेत. आणि प्रकल्पाचे काढलेले budget व सध्याचा खर्च यात सध्या तरी बरीच तफावतही आहे. पण काम सुरू आहे, आणि अजून काही महिन्यांनंतर व प्रकल्पाच्या लाभार्थ्यांची संख्या 20 झाल्यानंतर budget, expenditure व revenue यातील ही तफावत कमी होईल अशी आम्हाला आशाही आहे.

आणि या व्यतिरिक्तही बरेच updates आहेतच. बरेच वेगवेगळे अनुभव येत आहेत. कधीकधी अगदी ‘आता काय करायचे?’ किंवा ‘आपण काही चुकीचे तर करत नाही आहोत ना?’ असे प्रश्नही पडतात, कधीकधी खुप काळजीही वाटते. पण या सोबतच खुप साऱ्या चांगल्या गोष्टीही घडत आहेतच. आणि सध्या आम्ही अगदी थकून जात असलो तरीही, आम्हाला वेळ अगदी अपुरा पडत असला तरीही, आम्ही खुप आनंदी आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *